चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील रोटरी क्लबच्या वतीने कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील सुवर्णा स्मृती उद्यानात आज (दि.२९) चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे, यांच्यासह प्रकल्प प्रमुख स्वप्नील कोतकर, संजय चौधरी, मधुकर कासार, समकित छाजेड, राजेंद्र कटारिया, बलदेव पुन्शी, प्रा. अभिषेक देशमुख, सनी वर्मा, गणेश बागड आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप देशमुख यांनी केकी मुस यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगून चित्रकलेच्या माध्यमातून अनेक परीक्षा देवून याचा लाभ आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा घेता येत असतो, ते स्पष्ट केले. एलिमेंटरी, इंटरमीजिएट यासारख्या चित्रकलेच्या परिक्षांचे महत्व जाणून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. तसेच चित्रकला हा छंदाबरोबर जीवन जगण्याची कला शिकवण्याचे माध्यम असून अंगी असलेली कोणतीही कला वाया जात नसल्याचे चित्रकार धर्मराज खैरनार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कलाशिक्षक धर्मराज खैरनार,मनोज पाटील, सादिक शेख, अमोल येवले, अमोल रोजेकर, सागर मोरे यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच सोहम पिंगळे, विश्वेश पाटील, रणवीर पाटील, गणेश मोरे (पोहरे) या विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. कलाशिक्षकांनी चित्रकलेच्या माध्यमातून महत्वपूर्ण नोंदीचे प्रभावी मार्गदर्शन करुन अवघड वाटणारे चित्र सोपे करुन दाखविले. रंग भरण्याच्या सोप्या पध्दती, निसर्ग चित्र, स्केचिंग, डिझाईन याविषयक प्रात्यक्षिके सादर करुन दाखवली. अंक, अक्षर यासह अनेकविध प्रकारातून चित्र रेखाटण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेत चित्रांचा आनंद घेतला तर मुक्त कलाविष्काराच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांची चित्रकलेविषयक असलेली भीती दुर झाल्याचे यावेळी दिसून आले. प्रास्ताविक मधुकर कासार यांनी केले तर आभार नरेंद्र शिरुडे यांनी मानले.