Home Cities रावेर  विवरे बेंडाळे हायस्कूलमध्ये शोकसभा संपन्न 

 विवरे बेंडाळे हायस्कूलमध्ये शोकसभा संपन्न 

0
148


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे (ता. रावेर) येथे एक हृदयस्पर्शी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. निमित्त होते, गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील व प्रमिलाताई यांच्या मातोश्री आणि शिक्षण विकास मंडळाच्या ज्येष्ठ सभासद असलेल्या स्वर्गीय गोदावरी वासुदेव पाटील यांच्या निधनाचे. त्या ९३ वर्षांच्या होत्या आणि दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

शोकसभेच्या प्रारंभी स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी फुलांनी अभिवादन करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी बोलताना अनेक वक्त्यांनी स्व. गोदावरी पाटील यांच्या समाजसेवेतील योगदानाचे आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या उपस्थितीचे स्मरण केले. त्या केवळ एक माता नव्हत्या तर शिक्षण, शिस्त, संस्कार आणि सेवाभाव यांचा आदर्श जिवंत करणारा दीपस्तंभ होत्या, असे गौरवोद्गार या वेळी व्यक्त करण्यात आले.

शास्त्री विद्यालय पिंपळगाव बु॥ (ता. भुसावळ) येथील माजी मुख्याध्यापक शांताराम पाटील यांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतातून स्व. गोदावरी आईंच्या शांततामय, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ जीवनशैलीचे दर्शन घडवले. संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे, ज्येष्ठ संचालक व्ही.एस. राणे, माजी सरपंच पत्रकार वासुदेव नरवाडे यांसह इतर मान्यवरांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

शोकसभेसाठी शाळेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे, उपाध्यक्ष गोपाळ राणे, सचिव केशव राणे, ज्येष्ठ संचालक धनजी लढे, व्ही.एस. राणे, रामचंद्रराव देशमुख, दिलीप राणे, मुख्याध्यापक पी.एच. वायकोळे, पर्यवेक्षक आर.टी. कोल्हे, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बेंडाळे व्यासपीठावर उपस्थित होते.

शोकसभेचे सूत्रसंचालन एस.व्ही. येवले सर यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी वातावरण अत्यंत भावुक झाले होते आणि प्रत्येकाच्या मनात स्व. गोदावरी आईंच्या स्मृतींनी स्थान घेतले होते.


Protected Content

Play sound