Home Cities जळगाव लासलगाव व बीडमधील दोन तरुणांच्या निर्घृण हत्येचा निषेध; वाल्मिकी समाज संघटनेचे निवेदन

लासलगाव व बीडमधील दोन तरुणांच्या निर्घृण हत्येचा निषेध; वाल्मिकी समाज संघटनेचे निवेदन

0
242

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि बीड शहरात दलित वाल्मिकी मेहतर समाजाच्या दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही हत्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज संघटनेच्या वतीने मंगळवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या दोन्ही प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि मृत तरुणांच्या कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे १७ सप्टेंबर रोजी कुंदन नरेश चावरिया (वय २०) या दलित वाल्मिकी मेहतर समाजाच्या तरुणाची जातीय द्वेषाच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत बीड शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या यश देवेंद्र ढाका (वय २२) या तरुणाची २ सप्टेंबर रोजी काही तरुणांनी चाकू भोसकून खून केला. या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून, जातीय द्वेष आणि वैयक्तिक वादातून तरुणांचे भविष्य हिरावून घेण्यात आले आहे, असे संघटनेने निवेदनात नमूद केले.

या दोन्ही घटनांचा महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज संघटनेने तीव्र निषेध केला आहे. आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी दिलीप चांगरे, सुरेश सांगोले, किशोर करोसिया, रमेश घुसर, राजू हंसकर, सुरेश सांगिले यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या घटनेमुळे महाराष्ट्रातील दलित समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound