Home प्रशासन यावलमध्ये मतपेट्यांच्या सुरक्षेची चिंता; तहसीलदार नाझिरकर यांची उमेदवारांनी घेतली भेट

यावलमध्ये मतपेट्यांच्या सुरक्षेची चिंता; तहसीलदार नाझिरकर यांची उमेदवारांनी घेतली भेट


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मतदान यंत्रणेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताची माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल वसंत पाटील यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह यावल येथील तहसील कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रे ज्या स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आलेली आहेत, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही पाळत आणि पोलीस बंदोबस्त याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

उमेदवारांनी मतपेट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केली आणि समाधान व्यक्त केले. निकाल जाहीर होईपर्यंत ईव्हीएमची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावल नगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वी उमेदवारांकडून घेण्यात आलेल्या या आढाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


Protected Content

Play sound