मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेले शासकीय तंत्रनिकेतन निधीअभावी गेल्या सहा वर्षांपासून अपूर्णावस्थेत पडून आहे. इमारत बांधून तयार असतानाही केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही, असा आरोप करत आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शैक्षणिक वर्ष २०२६ पासून या तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशीही त्यांची मागणी केली आहे.
१८० विद्यार्थ्यांना मिळणार तांत्रिक शिक्षण :
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत आणि तांत्रिक शिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ बनावेत, या उदात्त हेतूने मुक्ताईनगर येथे २०१५ मध्ये या शासकीय तंत्रनिकेतनला मंजुरी देण्यात आली होती. येथे प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता असलेल्या तीन शाखांना मान्यता मिळाली आहे. हे तंत्रनिकेतन सुरू झाल्यास दरवर्षी १८० कुशल पदविका धारक तंत्रज्ञ तयार होऊन बाहेर पडतील. मात्र, इमारत पूर्ण होऊनही गेल्या सहा वर्षांत उर्वरित कामांसाठी एक रुपयाही निधी मिळालेला नाही. निधीअभावी हे महत्त्वाकांक्षी केंद्र निष्क्रिय राहिले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६ पासून प्रवेश सुरू करा :
आ. खडसे यांनी विधानपरिषदेत शासनाचे लक्ष वेधत मागणी केली की, उर्वरित कामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचबरोबर आवश्यक फर्निचर, मशिनरी आणि पदनिर्मितीसाठी लागणारा निधी तात्काळ मंजूर करावा. शासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करून शैक्षणिक वर्ष २०२६ पासून या तंत्रनिकेतनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. शासनाने या मागणीची त्वरित दखल घेऊन अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



