जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अखाद्य तूपाची अनधिकृतरित्या विक्री करत आर्थिक नुकसान करुन गैरव्यवहार केल्या प्रकरणी चौकशी व्हावी. या मागणीसाठी जळगाव शहर स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात, “जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगांव ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत सहकारी संस्था असून संघाचे कार्यक्षेत्र जळगांव जिल्हा आहे. संघावर दिनांक १५ सप्टेंबर, २०१५ ते २८ जूलै, २०२२ पर्यंत संचालक मंडळ कार्यरत होते. नंतरच्या काळात महाराष्ट्र शासनाने निर्णय नुसार दिनांक २९ जूलै, २०२२ अन्वये संघाचे संचालक मंडळ बरखास्त करुन ११ सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केलेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासक मंडळाने दिनांक २९ जूलै, २०२२ रोजी सायंकाळी संघाच्या व्यवस्थापनाचा पदभार स्वीकारलेला आहे.
प्रशासकीय समिती सभा क्रमांक ३, दिनांक २९ ऑगष्ट, २०२२ रोजी विषय क्र. १७ अन्वये अखाद्य (बी-ग्रेड) तूप मात्रा सुमारे ९१५ किलो अंदाजीत रक्कम रु.७८ लाख सदरचा विषय विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने टिपणी विक्री विभागाचे प्रमुख अनंत अंबीकर यांनी सादर केली होती. या कामासाठी दिनांक २६ ऑगष्ट रोजी एका वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन खरेदीदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतू विक्री विभागाने “संघाकडे साठा शिल्लक / उपलब्ध नाही” असे सांगीतले आणि निखील सुरेश नेहेते व अन्य यांनी विनामंजूरीने अनधिकृतपणे मे. विठ्ठल रुखमिणी एजंन्सी, जळगांव यांना एकूण १८०० किलो माल, दिनांक १ ते २३ ऑगष्ट २०२२ या कालावधीत रक्कम रु. १ लाख ५३ हजार इतक्या कमी किमतीत विक्री करुन अपहार केलेला आहे.
त्यावर प्रशासकीय समितीने असे म्हटले की, “मागील प्रशासकीय समिती सभा क्र. २, दिनांक १३ ऑगष्ट, २०२२ रोजी अखाद्य (बी-ग्रेड) तूप विक्री करु नये. असे निर्देश दिलेले असतांना तूप विक्री झाल्याने त्यामागे संघास नुकसान पोहचण्याचा हेतू होता की काय ? तसेच प्रमुख विक्री विभागाचे श्री. अंबीकर, यांनी दिनांक २३ ऑगष्ट, २०२२ रोजी त्यांच्याकडे बी ग्रेड तुपाचा साठा नसतांना सुध्दा प्रशासकीय समितीला ९१५ किलो बी-ग्रेड तूप विक्री करण्यासाठी टिपणी दिली. तथापी प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी बी-ग्रेड तुपाच्या नमून्याची मागणी केली असता ते उपलब्ध करुन दिलेले नाहीत.
यावरुन असे निदर्शनास येते की, ए ग्रेड तूप ज्याची किंमत रुपये ५२५.०० प्रती किलो असते ते बी ग्रेड तूप म्हणजेच रु. ८५.०० प्रती किलो विक्री केली असून संस्थेचे रक्कम रु. ७.९२ लाख आर्थिक नुकसान करुन गैरव्यवहार केलेला आहे. याबाबत योग्य ती तक्रारीची चौकशी करुन गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी विद्यमान संचालक मंडळ यांनी केले असून या संदर्भात जळगाव शहर स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.”