Home क्राईम मुक्ताईनगरात नुकसानभरपाई घोटाळा उघडकीस; कोतवाल, दोन तलाठी व क्लर्क निलंबित

मुक्ताईनगरात नुकसानभरपाई घोटाळा उघडकीस; कोतवाल, दोन तलाठी व क्लर्क निलंबित

0
415

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. उचंदा गावातील कोतवालाला पोलिसांनी सहा दिवसांच्या कस्टडीत घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, संबंधित दोन तलाठी आणि एका क्लर्कला निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर शेतकरी वर्गामध्ये “या संपूर्ण खेळीचा खरा सूत्रधार कोण?” असा तीव्र सवाल उपस्थित केला जात आहे.

या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे तहसीलदार यांनी संबंधित तलाठ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. याबाबत विचारणा केली असता तहसीलदारांनी “आम्ही प्रस्ताव पाठवला आहे, परंतु निलंबनाची अंमलबजावणी झाल्याची माहिती माझ्याकडे नाही,” अशी भूमिका मांडली. दरम्यान, जिल्हाधिकारी जळगाव यांनी अधिकृत माहिती देत “एक कोतवाल, दोन तलाठी आणि एक क्लर्क अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे,” असे स्पष्ट केले.

या प्रकरणात सुरुवातीला आमदार चंद्रकांत पाटील यांनी फक्त राजुरा आणि बोरखेडा गावांतील अनियमिततेकडे लक्ष वेधले होते. मात्र, तपासात आता आणखी सहा गावांमध्ये भरपाई निधीच्या वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत असून, या प्रकरणाचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४ कोटी २१ लाख ४९ हजार ६३० रुपयांची मदत मंजूर करून ती १९ हजार २१६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. मात्र चौकशीत असे समोर आले आहे की, काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर भरपाई दाखवण्यात आली, तर काही ठिकाणी कमी क्षेत्र दाखवून जास्त रक्कम घेतली गेली. या मार्गाने लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक चौकशीत सुमारे १३ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार उघडकीस आला असून, आणखी चार गावांमध्ये बनावट लाभार्थ्यांना निधी वितरित झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी एकूण गैरव्यवहाराची रक्कम ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे महसूल विभागातील पोर्टल प्रणालीतील त्रुटीही उघड झाल्या आहेत. सदोष प्रणालीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना मनमानी करण्याची संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांचे लक्ष आता चौकशीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.

निलंबित अधिकाऱ्यांमध्ये राहुल रवींद्र सोनवणे (कोतवाल), महेंद्र राजेंद्र वंजारी (तलाठी), कृष्णकुमार आर. ठाकूर (तलाठी) आणि मोनीश बेंडाळे (क्लर्क) यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांचा सवाल एकच — “निलंबन झाले, पण खरा सूत्रधार कधी उघडकीस येणार?”


Protected Content

Play sound