पारोळा प्रतिनिधी- धोत्रे व उमरे गावांच्या मधील पांझर तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह मुसळदार पावसामुळे मौजे धोत्रे व उमरे या दोन्ही गावांच्या मधील पाझर तलाव फुटल्याने जवळच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बळीराजा अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून त्यावर हे संकट खूप मोठे आहे. पांझरतलाव फुटल्याने सभोवतालच्या शेतात पाणी शिरून सद्य स्थितित शेतात उभ्या असलेल्या कापूस, निंबू, पपई, केळी ह्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. बळिराजाला ह्या आलेल्या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. मौजे धोत्रे व उमरे गावांच्या मधील पांझरतलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून बळिराजाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी, जळगांव, जिल्हा कृषि अधिक्षक, जळगांव यांच्याकडे केली आहे.