जळगाव प्रतिनिधी । अनुकंपा तत्वावर तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी उपमहापौर सुनिल खडके यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर उपोषण स्थगित केले आहे.
जळगाव शहर मनपातील अनुकंपाधारकांना ७ वर्ष होऊनही सेवेत घेतले जात नसल्याने सोमवारपासून त्यांनी मनपाच्या इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली होती. दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेद्र घुगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, लेखी आश्वानानंतर च आपण उपोषण मागे घेऊ असा पवित्रा घेतला. या चर्चेतून काहीच तोडगा न निघाल्याने अनुकंपा धारकांनी उपोषण सुरू ठेवले होते.
आमदार व महापौर महापालिकेतून निघून गेले. यानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी संध्याकाळी ६.३० वाजता उपोषण स्थळाला भेट दिली. त्यांनी उपोषण कर्त्यांना शासनाकडे आकृतीबंध मंजुरी साठी पाठविला असल्याची माहिती दिली. अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक असणारे पत्र शासनास पाठविले असल्याचे सांगितले. यानंतर उपोषण कर्त्यानी त्यांचे उपोषण स्थगित केले. महिन्याच्या आत नियुक्ती न मिळाल्यास पुन्हा उपोषण करू या अटीवर उपोषण करत्यानी उपोषण सोडले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील देखील उपस्थित होते.