
पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील वकील बांधव तसेच पक्षकारांची गैरसोय टाळण्यासाठी पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू करण्याची मागणी शासनदरबारी लावून धरणार असल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली. ८ मार्च रोजी पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

न्यायालयासाठी जागेचा प्रश्न सुटला :
आमदार पाटील यांनी सांगितले की, २०१४ पासून या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागेच्या कमतरतेचा मुद्दा समोर आला होता. मात्र, सद्यस्थितीत पाचोरा न्यायालयात मुबलक जागा उपलब्ध आहे. चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर झाले असले तरी, पाचोरा-भडगावच्या पक्षकारांना ते आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासाच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे पाचोऱ्यातच हे न्यायालय व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.
महसूल कामकाजासाठी जळगावच सोयीचे :
चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू होत असून पाचोरा-भडगावचे महसूल अपील कामकाज तेथे वर्ग होणार असल्याची माहिती आहे. यावर वकिलांनी आक्षेप घेतला आहे. पाचोरा-भडगावच्या नागरिकांना जळगाव येथे जाणे अधिक सोयीचे आहे. त्यामुळे, एकतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस पाचोऱ्यात येऊन सुनावणी घ्यावी किंवा हे कामकाज पूर्वीप्रमाणे जळगाव येथेच सुरू ठेवावे, अशी मागणी वकिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालयासाठीही कटिबद्ध :
केवळ न्यायालयच नव्हे, तर पाचोरा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे तालुक्यातील नागरिकांचे श्रम, पैसा आणि मानसिक त्रास वाचण्यास मोठी मदत होईल. या पत्रकार परिषदेला बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांच्यासह पाचोरा न्यायालयातील मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.



