बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाण्यात यंदाचा गणेशोत्सव काहीसा वेगळ्या रंगात रंगलेला आहे. उर्वरित राज्यात जिथे पोलिसांचा उत्सवात केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरता सहभाग असतो, तिथे बुलढाण्यात मात्र खाकी वर्दीतील पोलीस बाप्पाच्या चरणी लीन होत नागरिकांसोबत भक्तीभावाने सहभागी होत आहेत. विसर्जनाच्या दोन दिवस आधीच पोलिसांनी घेतलेले हे अभिनव पाऊल जिल्ह्यात सामाजिक ऐक्य, विश्वास आणि सौहार्दाचे प्रतीक बनले आहे.

दहा दिवसांच्या बाप्पाच्या स्वागतानंतर विसर्जनाच्या दिवशीही तोच उत्साह टिकून राहावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता पोलीस दल कमालीचं सजग झालं आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकारी थेट गणेश मंडळात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत, आरतीत सहभागी होत आहेत, आणि नागरिकांना दिलासा देत आहेत की पोलिसही आपल्यातलेच आहेत. ही दृश्यं सध्या बुलढाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पहायला मिळत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक सकारात्मक आणि स्तुत्य घडामोड ठरत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू असून, जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या गणेश मंडळांना भेटी देऊन, पोलिसांनी नागरिकांच्या मनातील पोलीस दलाबाबतचा दुरावा कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. अशा प्रत्यक्ष संवादामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होत असून, विसर्जनाच्या दिवशी पोलीस दलाचा प्रत्येक घटक शिस्त आणि सुरक्षेची हमी देण्यासाठी सज्ज आहे.
गावोगावी आकर्षक सजावटींमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या मिरवणुकांदरम्यान शांतता राखावी, गर्दीवर नियंत्रण ठेवावे आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी पोलीस दलाची मोठी जबाबदारी असते. मात्र केवळ जबाबदारी पुरती भूमिका न निभवता, त्यामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा एक भाग बनणे – ही भावना या उपक्रमातून दिसून येते.
“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात पोलिसांनी आरती करत नागरिकांना दिलेला सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि शिस्तीचा संदेश पोहोचतो. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन, हा उपक्रम सामाजिक ऐक्याची साक्ष देणारा ठरत आहे. पोलीस दल केवळ कायदा आणि शिस्त यांचे रक्षण करणारे नसून, समाजाच्या आनंदातही सहभागी होणारे सहकारी आहेत, हेच या प्रयत्नातून अधोरेखित होत आहे.



