शिर्डी – प्रतिनिधी । शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी आज शिर्डी येथे झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहून शरद पवार गटाला धक्का दिला. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सतीश चव्हाण यांच्यावर पक्षविरोधी कामगिरीच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाई केली होती. 2024 मध्ये त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. यामुळे ते अजितदादा गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सतीश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा गट सोडून अजित पवार यांची साथ धरली होती. परंतु, नंतर ते शरद पवार यांच्याकडे परतले. यामुळे त्यांना पक्षांतर्गत सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र, 13 जानेवारी 2025 रोजी त्यांनी शरद पवार गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता अजित पवार गटाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सतीश चव्हाण हे 2008 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य आहेत.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाण यांच्या प्रवेशाचे स्वागत करत म्हटले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुती सरकारच्या विकासात्मक कामगिरीवर विश्वास ठेवून सतीश चव्हाण यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि सरकारला मोठा लाभ होईल.”