बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि बीड जिल्ह्याचे माजलगाव येथील ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपला राजकीय वारसदार देखील जाहीर केला आहे. राजकारणात मोठ्या व्यक्तीने कुठे थांबायचे हे ठरवायला हवे, शरद पवार यांनी देखील वेळीच थांबायला हवे होते, अशा शब्दात प्रकाश सोळंके यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील राजकारणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेताना आपल्या पुतण्या जयसिंह सोळंके हे माझे राजकीय वारसदार असतील अशी घोषणा केली आहे. ही घोषणा करतानाच राजकीय निवृत्तीचे कारण देत त्यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. राजकारणामध्ये मोठ्या व्यक्तीने कुठे थांबायचे हे आता ठरवायला हवे. पवार साहेब हे देखील थांबले असते तर त्यांच्या घरामध्ये जे घडले ते घडले नसते, असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाच सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडले ते आतापर्यंतच्या आयुष्यात मी कधीही पाहिले नव्हते. मात्र येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच विधानसभेमध्ये जे लोकसभेला घडले ते घडणार नाही, असा दावा देखील त्यांनी केला. मी राजकारणातून निवृत्ती घेतली असती तरी तर सर्व यंत्रणांमध्ये काम करणार असल्याचे देखील ते म्हणाले.