मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील रूग्णांसाठी पुरेसा ऑक्सीजन नसल्याने उपोषणाचा इशारा देणारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाने मागणी मान्य केल्यामुळे उपोषण स्थगित केले आहे.
याबाबत वृत्त असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिनांक २ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. तथापि, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मध्यस्थी करीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण व जिल्ह्याचे ऑक्सिजन वितरण व्यवस्था करणारे जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना तात्काळ सूचना करीत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ देवू नका असे निर्देश दिले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिले तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयासाठी तात्काळ रु.२.५० कोटीच्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट ची प्रशासकीय मान्यता दिली तरी सदरील प्लांट चे काम येत्या ८ दिवसात सुरू होऊन महिन्याभराच्या आत सदरील ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू होणार आहे. यामुळे ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्यामुळे आमदार पाटील यांनी आपले उपोषण स्थागित करण्याचा निर्णय घेतला आहे.