बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सुचना

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे, वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

( Image Credit Source : Live Trends News )

जळगाव जिल्हयातील अनेक शेतकरी शेतात जाण्याकरीता तसेच शेतमाल शेतातून बाहेर काढण्याकरीता वारंवार रस्त्यांची मागणी करीत असतात. यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक असल्याने रस्ते कालबध्द रितीने खुले करणे व मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे या करीता कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १० टप्प्यात १ जानेवारी २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गट विकास अधिकारी, उपअधिक्षक, भूमी अभिलेख व तहसिलदार यांच्या सहाय्याने रस्ता खुला करणे, जे रस्ते खुले करण्यात येतील असे रस्ते मातोश्री ग्रामसमृधी शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत घेऊन कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यान्वयन संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी हे करणार आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरिक्षक यांच्या सहकार्यने ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग कालबध्द रितीने खुले करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबधित अधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Protected Content