भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ- विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्याचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सन्मानित केले.
जिल्ह्यातील शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण तसेच शहरातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जन्माच्या नोंदी केलेल्या नसल्याने त्यांना जन्मदाखला मिळत नव्हता, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी शाळेत शिकत असले तरी शाळेच्या युडायस मध्ये आधार क्रमांक नसल्याने नोंदी होत नव्हत्या. विद्यार्थी पटावर दिसत नसल्याने शाळेतील संच मान्यता होत नसल्याने पटसंख्या असूनही शिक्षक अतिरिक्त ठरत होते. नेमकी समस्या जाणून जिल्हाधिकारी यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना बोनाफाइड बनवून प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांचेकडे देण्याचे सांगून तहसीलदार व प्रांताधिकारी यांना जन्मदाखले देण्यासंदर्भात आदेश दिले. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना फायदा होणार असून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर देशात फक्त जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत दखल घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिल्यामुळे भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर,सचिव ज्ञानदेव इंगळे, कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, कार्यकारिणी सदस्य पोपटराव पाटील,प्रकाश विसपुते, दिनकर जावळे, वडतकर सर हे उपस्थित होते.