जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर पासूनच दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून दिवसेंदिवस उष्णतेत एक ते दोन अंश वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आर्द्रतेत देखील बदल झाला असून जिल्हा परिसरात ढगाळ वातावरणामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपात तुरळक सरींसह बेमोसमी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढता आहे. गेल्या सप्ताहात तापमानाचा पारा कमाल ३२ ते किमान २७ अंशासह आर्द्रतचे प्रमाण ३४ टक्के होते. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा चढता असल्याचे जाणवून येत असतानाच वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी ११ वाजे दरम्यान तापमानाचा पार ३५ अंशावर असून किमान २३ अंश तर हवेतील आर्द्रता ३० टक्के असल्याचे दिसून आले आहे.
येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या पूर्व भागात फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव आदी प्ररीसरात तीन ते पाच मी.मी. तर भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि जळगाव या तालुक्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मध्यम हलक्या पावसाची शक्यता आहे.