जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी सर्कल, इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवत, झुडपे व जंगली झाडांनी विद्रूप स्वरूप धारण केले होते. नागरिकांना अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत असतानाही संबंधित प्रशासन निष्क्रिय राहिले होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाम इशाऱ्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि परिसर स्वच्छतेने उजळून निघाला.
मनसे जळगाव शहर तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना निवेदन देत आकाशवाणी सर्कल परिसराची तातडीने साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली होती. निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, “आकाशवाणी चौक हा शहराचा चेहरा आहे. जर तीन दिवसांत परिसर स्वच्छ केला नाही, तर मनसे प्रतीकात्मक निषेध म्हणून सर्कलमध्ये बकऱ्या चारेल.” या ठाम भूमिकेनंतर शहरभर चर्चेला उधाण आले.

या इशाऱ्याने प्रशासनाच्या टेबलावर खळबळ माजली. नागरिकांनी मनसेच्या या भूमिकेचे स्वागत करत “अशा कठोर इशाऱ्यानेच अधिकारी जागे होतात” अशी प्रतिक्रिया दिली. शहरातील विविध भागांत नागरिकांनी सोशल मीडियावरही मनसेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
शेवटी मनसेचा इशारा प्रत्यक्ष परिणामकारक ठरला. आज सकाळी प्रशासनाने तातडीने आकाशवाणी चौक परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू केले. काही तासांतच गवत, झुडपे आणि कचरा हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ, आकर्षक आणि उजळ बनविण्यात आला. यावेळी नागरिकांनी दिलासा व्यक्त केला की, “शहरातील प्रत्येक सार्वजनिक स्थळ अशीच स्वच्छ ठेवली गेली, तर जळगावचे सौंदर्य अधिक खुलून येईल.”
स्वच्छतेच्या या उपक्रमावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, तसेच राजेंद्र निकम आणि दीपक राठोड उपस्थित होते. मनसेच्या या कृतीशील भूमिकेमुळे प्रशासनाला झटका बसला असून, शहरातील इतर सर्कल्स आणि चौकांची स्वच्छता देखील प्राधान्याने केली जाण्याची शक्यता आहे.



