पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील वाघरे गावात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान मोठ्या हाणामारीत झाले. या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला, तर त्याच्या नातेवाईकांनाही लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून, या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूच्या वादातून हल्ला
फिर्यादी विलास पंकज पाटील (वय २७) यांच्या काकांचा, गोविंदा रघुनाथ पाटील यांचा दारूच्या नशेत काही आरोपींशी ७ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता वाद सुरू होता. त्यांच्या आवाजाने विलास पाटील यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. विलास पाटील वाद मिटवून घरी परतल्यानंतर, काही वेळाने आरोपी शांताराम पाटील आणि अमोल पाटील फिर्यादींच्या घरासमोर आले. शांताराम पाटील याने विलास पाटील यांच्या डाव्या गालावर धारदार चाकूने हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

नातेवाईकांनाही मारहाण
हल्ल्यात जखमी झालेल्या विलास पाटील यांना त्यांचे नातेवाईक गौरव गोविंद पाटील, मोतीलाल पाटील, मांगीलाल पाटील आणि आशाबाई पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांनंतर ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना, आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांवरही हल्ला चढवला. बापू चुडामण पाटील आणि विनोद राजधर पाटील यांनी इतर दोन आरोपींसोबत मिळून नातेवाईकांना लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ‘तुम्हाला ठार मारू’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



