जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसापासून गायकवाड कुटुंबीय माझ्याविरुद्ध बदनामी करणारी माहिती माध्यमांमध्ये पसरवीत आहेत. कोणताही ठोस पुरावा नसतांना ते बेछूट आरोप करीत असल्याने माझी समाजात बदनामी होत आहे. माझ्या मालकीच्या मालमत्तेत जबरदस्ती वास्तव्य करून वकिलाकडून कायदेशीर नोटीस दिलेली असताना देखील ते घराचा ताबा न सोडता माध्यमांना चुकीची माहिती देऊन कोणताही ठोस पुरावा सादर करीत नाही. केवळ माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी त्यांचा हा उद्योग सुरु आहे. माझी समाजात बदनामी केल्याने मी संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले आहे.
..तर माझ्याविरुद्ध तक्रार केली असती
पंडित मोतीराम गायकवाड यांच्याकडून आम्ही घराची खरेदी १५ जुलै २०१५ रोजी केली. आज खरेदीला जवळपास ४ वर्ष पूर्ण झाले. जर आम्ही जोर जबरदस्तीने खरेदी केली असती तर आजवर त्यांनी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात तक्रार केली असती. पंडित गायकवाड यांनी स्वतःच्या मुलांविरुद्ध तक्रार केली होती, मी तर त्यांच्यासाठी कुणीही नाही त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार का केली नाही. गोविंद गायकवाड हे स्वतःच्या चुका आणि वडिलांना दिलेला त्रास झाकण्यासाठी माझ्यावर आरोप करीत आहे.
नोटीस दिल्याने केली खोटी तक्रार
खरेदी झाल्यानंतर आम्ही त्यांना दि.३ ऑक्टोबर २०१५ रोजी ऍड.सुनील तारे यांच्यामार्फत घराचा त्यांचा वरील मजल्याचा ताबा सोडावा यासाठी रीतसर नोटीस पाठविली होती. आम्ही पाठविलेल्या नोटीसला उत्तर न देता त्यांनी दि.८ ऑक्टोबर २०१५ रोजी आमच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात खोटी तक्रार दाखल केली होती. घराच्या खालील मजल्याचा ताबा असलेल्या लक्ष्मणदास हिराणी यांना देखील आम्ही.दि.३ ऑक्टोबर २०१५ रोजीच नोटीस पाठविली होती. नोटीस मिळाल्यानंतर त्याने आम्ही दोन्ही खरेदीदारांकडून पैसे घेतल्यानंतर दि.१२ ऑक्टोबर २०१५ रोजी घराचा ताबा सोडल्याची रीतसर रजिस्टर ताबा पावती करून दिली. आम्ही त्याला धनादेशद्वारे पैसे अदा केले आहेत.