चोपडा (प्रतिनिधी) नगरपरिषदेने यंदा घरपट्टीत तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा जुलमी व एकतर्फी निर्णय घेतला आहे. तसेच कचरा व्यवस्थापन आणि नियोजित पाण्याच्या नवीन पाईप लाईन वरुन कनेक्शनचा खर्च देखील आम जनतेवर टाकला जाणार आहे. त्यामुळे याविरोधात आंदोलनाचे स्वरूप व दिशा ठरविण्यासाठी आज बोथरा मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा, रस्ते, रहदारी, आरोग्य, स्वच्छता इत्यादी कोणत्याही स्वरुपाच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या न.प.ने भोंगळ आणि गलथान कारभाराचा अलिकडे कळस गाठला आहे. सामान्य माणसाच्या तक्रारींची साधी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासन कार्यरत असल्याचे कुठेही जाणवत नाही.
अशा या पार्श्वभूमीवर न.प.कारभारा विरोधात कायदेशीर व विधायक संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आंदोलनाचे स्वरूप व दिशा ठरविण्यासाठी उद्या गुरुवार, दि.२२ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता बोथरा मंगल कार्यालय येथे महत्त्वाची सभा अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली अमृतराज सचदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन दिलीप नेवे ,शाम जाधव, सुशिल टाटीया, मिलिंद सोनवणे, अजय पालिवाल, संदीप ओली, नारायण साळुंखे, सुधीर सोनार, स्वप्नील महाजन, मिलिंद शहा यांनी केले आहे.