चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे येथील गावाजवळील सांडपाण्यावरील रस्ता वाहून गेल्याने गावासह घरामध्ये सांडपाणी घुसले आहे. यामुळे जीवितहानी तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आला. या पुरामुळे शहरासह तालुक्यात अभुतपुर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे जनावरे व घरे वाहून जिवीतहानीसह वित्तहानी झाली. दरम्यान ३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ओढरे येथे गणेशपूर, ओढरे व पाटणाच्या दिशेने काढलेला सांडपाण्यावरील रस्ताच वाहून गेला. व रस्त्याखालील टोंग हे अस्ताव्यस्त झाले. मात्र सोमवार रोजी रात्रीपासून पुन्हा एकदा पाऊसाने जोर धरल्याने सांडपाणी हे गावांसह घरात शिरले आहे. यामुळे जिवीतहानीसह वित्तहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरिकांना जिवीतहानी व वित्तहानीला सामोरे जावे लागणार हे उघड झाले आहेत. त्याचबरोबर सांडवाच्या पाण्यात इलेक्ट्रिक डी.पी. बसविलेली असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला अधिक धोका असल्याचे ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेचे अशोक राठोड यांनी लाईव्ह ट्रेंड्सशी बोलताना सांगितले आहे तत्पूर्वी गणेशपूर मार्गाने चाळीसगावकडे जाणारा मार्गच बंद झाल्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. किंबहुना शहराकडे जाण्यासाठी नागरिकांना खूप कसरत करावी लागत आहे. पाऊसाने असेच उग्ररूप धारण केल्यास वार्ड क्र. ३ मधील नागरिक घरासह वाहून जातील अशी भिती नागरिकांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी संवाद साधताना व्यक्त केली आहे.