जळगाव (प्रतिनिधी) पावसाळ्यापूर्वी शहरातील पाच मुख्य व ७० उपनाल्यांची सफाई ७ जूनपर्यंत करण्याचे आदेश देउन आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी नाल्यांच्या साफसफाईबरोबरच त्याचे खोलीकरण करणे व आजूबाजूचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महापालिकेतर्फे पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जेसीबी व डंपर भाड्याने लावून ही नालेसफाई मोहिम राबविली जाणार असून दुर्लक्षित नाल्या काठाच्या अतिक्रमण काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. या बैठकीला आरोग्य विभाग, आपातकालीन विभाग, वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, याची दखल घेतली जाणार आहे. नाल्यांवर व नाल्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे बांधकाम आढळल्यास बांधकाम विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या मदतीने ते काढण्याचे आदेश दिले आहेत.
या नाल्यांची होणार सफाई
शिवाजी उद्यान स्मशानभूमी ते ममुराबाद रोड, शिवाजी उद्यान स्मशानभूमी ते नॅशनल हायवेपर्यंत, नॅशनल हायवे ते नेरी नाका स्मशानभूमीपर्यंत, नेरी नाका स्मशानभूमी ते असोदा पूल, असोदा पूल ते ममुराबाद रेल्वेपुलापर्यंत, मानराज मोटर्स ते म्हाडा खेडीपर्यंत, मेहरुण एमएसईबी कॉलनी ते इक्बाल कॉलनी, समतानगर ते पिंप्राळा दीपक फूडपर्यंत, रामदास कॉलनी ते सुरत रेल्वेगेट या भागांतील नाल्यांची सफाई होईल.