जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अर्थात सीटूच्या जिल्हा समितीच्या वतीने कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळात धरणे, निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. परंतू अद्यापपर्यंत शासनस्तारावर कोणतीही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करावी, खासगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घेण्यात यावे, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या सह इतर मागण्यांसाठी बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनीटांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, प्रविण चौधरी यांच्यासह कामगार व महिला कामगार उपस्थित होत्या.