
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील जुन्या नाल्यावर सुरू असलेल्या आरसीसी अतिक्रमणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी अवैध आरसीसी बांधकामे सुरू असून, या प्रकारामुळे शहरातील नैसर्गिक जलवाहिनीत अडथळा निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषद शाळेजवळून सुरू होणारा हा नाला मेहतर कॉलनीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या मागील बाजूने वाहतो. या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, काही व्यावसायिकांनी आपली दुकाने वाढविण्यासाठी नाल्याच्या जागेवर आरसीसी प्लास्टरचे बांधकाम करून वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केला आहे. ही स्थिती पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक गंभीर बनली असून, अडथळा झाल्यास शहरातील निचऱ्याचे पाणी रस्त्यांऐवजी घरात घुसण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे आणि अतिक्रमण विरोधी पथकाचे राठोड यांना अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. “नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने अडथळा निर्माण करणाऱ्या आरसीसी रचना तोडण्यात याव्यात,” असा स्पष्ट मागणीचा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे. अनेकांनी सांगितले की, नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात जलप्रलयासारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलवाहिन्या आणि नाल्यांचे संरक्षण अत्यंत गरजेचे असतानाही, स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष हे चिंता वाढवणारे आहे. या संदर्भात संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर नागरिकांनी रास्ता रोको, तक्रारीसह अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



