मुंबई-वृत्तसेवा | इरान-इस्त्राइल युध्दामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इराण आणि इस्त्राइल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर पर्यटन, व्यवसाय किंवा इतर कारणांनी गेलेल्या अनेक भारतीयांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे. यानंतर राज्य सरकारने तत्काळ केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. मंत्रालयाने संबंधित भारतीय दूतावासांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या.

या परिस्थितीत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला असून अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, फडणवीस यांनी सांगितले की, एअर इंडिया ची विमाने हळूहळू सेवा सुरू करत असून उपलब्ध एअरस्पेसचा वापर करून नागरिकांना परत आणले जात आहे. काही देशांच्या हवाई क्षेत्रावर निर्बंध असले तरी ज्या मार्गाने प्रवास शक्य आहे त्या मार्गाने नागरिकांची सुरक्षित परतफेड केली जात आहे.
कुवेतमध्येही काही प्रवासी ट्रान्झिटमध्ये अडकले होते. त्यांच्याकडे व्हिसा नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे त्यांना सध्या सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. तसेच राज्याच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल यांनाही या प्रक्रियेत समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय भारतीय दूतावासाची बैठक घेऊन तेथील नागरिकांसाठी आवश्यक Standard Operating Procedures जारी करण्यात आल्या असून, अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



