Home Cities अमळनेर एकतास येथील नागरिकाचा कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा

एकतास येथील नागरिकाचा कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा


अमळनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकतास गावात वडिलोपार्जित घर बेकायदेशीररीत्या हडप केल्याचा गंभीर आरोप करत एका नागरिकाने थेट अमरण उपोषणाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, न्याय मिळावा यासाठी आता कुटुंबासह उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ आनंदा पाटील (बच्छाव), वय ४७, रा. एकतास, ता. अमळनेर, जि. जळगाव यांनी उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, एकतास येथील घर मिळकत क्रमांक ५३ ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता असून, ती अनेक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात व उपभोगात आहे. मात्र काही व्यक्तींनी संगनमत करून या मालमत्तेवर बेकायदेशीररीत्या दुसऱ्याचे नाव शासन दप्तरी चढवले असून, यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मागील तीन ते चार वर्षांपासून गावातील काही व्यक्तींकडून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण, धमक्या व मानसिक छळ सहन करावा लागला आहे. यापूर्वी तब्बल ३५ जणांविरोधात त्यांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असतानाही परिस्थिती सुधारलेली नाही. उलटपक्षी, त्यांना गावाबाहेर हाकलण्याच्या उद्देशाने कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत एकतास येथे घराच्या नमुना क्रमांक ८ साठी अर्ज केला असता, संबंधित कर्मचाऱ्यांनी घराचा उतारा देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उलट घरपट्टी व पाणीपट्टी म्हणून एकूण २,२५२ रुपये रोखीने भरायला लावून, पावत्या हस्ते देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. नमुना ८ मिळाल्यानंतर त्यामध्ये आरोपी महिलेचे नाव मालक म्हणून नमूद असल्याचे दिसून आल्याने आपण हादरून गेल्याचे फिर्यादीने सांगितले.

या संदर्भात ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता, सद्याचे ग्रामसेवक नव्याने रुजू झाल्याने पूर्वी कोणत्या ठरावानुसार नाव नोंद झाले, याची माहिती देऊ शकत नसल्याचे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर तसेच ग्रामपंचायत एकतास येथे लेखी अर्ज देऊनही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

याच दरम्यान, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर येथील भूमी अभिलेख कार्यालय परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्याला अडवून शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. “केसेस मागे घेतल्या नाहीत तर घर परत मिळणार नाही, उलट कुटुंबाला जीव गमवावा लागेल,” अशी धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

फिर्यादीने संबंधित आरोपी, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर सहकाऱ्यांवर फसवणूक (कलम ४२०) तसेच शासकीय दप्तरी बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच घर मिळकत क्रमांक ५३ कोणत्या दस्तऐवजांच्या आधारे व कोणत्या ठरावानुसार हस्तांतरित झाली, याची सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, गोकुळ पाटील यांनी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाबाहेर कुटुंबासह अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. भविष्यात स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आरोपी व अधिकारी यांची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound