जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ख्रिस्ती समाजाचा प्रमुख सण असलेला नाताळ जळगाव शहरात भक्तीमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. पांडे डेअरी चौक येथील डॉ. अॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलैडर मेमोरियल अलायन्स चर्च, जळगाव येथे ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात एकत्र आले होते.
आज दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता धर्मगुरू रेव्हरंट शशिकांत वळवी यांच्या उपस्थितीत नाताळच्या प्रार्थना व उपासनेस सुरुवात झाली. प्रारंभी ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरोल्स म्हणजेच नाताळ गीते गायली. या गायनात महिला, युवक संघ तसेच लहान बालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण चर्च परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यानंतर बायबल वाचन करण्यात आले आणि संपूर्ण विश्वात शांती नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांची मनं आध्यात्मिक शांततेने भरून गेली होती. प्रवचनात रेव्हरंट शशिकांत एम. वळवी यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, येशू हा शांतीचा अधिपती असल्याचे सांगितले.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सर्व मानवजातीस शांती व तारण मिळावे यासाठी बेथलेहेम येथे गोठ्यात येशूचा जन्म झाला, असे त्यांनी नमूद केले. येशूची शिकवण ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण मानवजातीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रेम, दया, क्षमा आणि शांती या मूल्यांवर आधारित येशूच्या शिकवणीप्रमाणे आचरण केल्यास मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळते, असा संदेश त्यांनी दिला.
आज कुटुंब, समाज आणि राष्ट्र पातळीवर शांतीची नितांत गरज असल्याचे सांगत, येशूने जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीच या भूतलावर जन्म घेतला होता, असे त्यांनी आपल्या प्रवचनात अधोरेखित केले. येशूने मानवाला पापापासून मुक्त करून प्रेम व करुणेचा मार्ग दाखवला असून, त्याच्या शिकवणीमुळेच शांती व तारण प्राप्त होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या नाताळ प्रार्थना सभेस जळगाव शहरातील ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता, ज्यामुळे चर्च परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या नाताळ उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी चर्चचे सचिव प्रा. विनय गायकवाड, खजिनदार प्रकाश शिंदे, बेंजामीन मकासरे, बथुवेल नाईक, संजय पारधनी, दीपक नन्नवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जॉन डॅनियल, उल्हास इंगळे, अजित खिल्लारे, स्मिता पारधनी, पवन गवांदे, सौ. ऐथेल गायकवाड, सरोज शिंदे, पुष्पा गवांदे, सुवर्णा खिल्लारे तसेच युवक संघ, संडे स्कूल आणि महिला संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकूणच नाताळ सणाच्या निमित्ताने जळगावात प्रेम, शांती आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा उत्सव भक्तीभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.



