भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मज्जाव केला असून हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते छोटेलाल हरणे यांनी केली आहे. तर काहीही झाले तरी अतिक्रमणग्रस्तांबाबतचे निवेदन देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळ शहरात येत आहेत. दरम्यान, यात्रेआधीच आमदार संजय सावकारे यांनी या दौर्यात कोणत्याही प्रकारची निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊ नयेत अशी भूमिका घेतल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते छोटेलाल पतीराम हरणे यांनी काहीही झाले तरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारच असल्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, निवेदनाच्या माध्यमातून आम्ही लोकशाही मार्गाने अतिक्रमणग्रस्तांच्या समस्या मांडणार आहोत. मात्र आमदार संजय सावकारे यांनी लोकशाहीचा गळा घोटून निवेदन देण्यासाठी बंदी घातली आहे. मात्र काहीही झाले तरी आपण निवेदन देण्याचा प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांनी भुसावळातील अतिक्रमणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची गळ घालणार असल्याची माहिती छोटेलाल हरणे यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजशी बोलतांना दिली.
याप्रसंगी हरणे यांनी आमदार संजय सावकारे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, दहा वर्षांपासून आमदारकी असूनही ते नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करू शकले नाहीत.
पहा : सामाजिक कार्यकर्ते छोटेलाल हरणे यांनी केलेल्या टिकेचा व्हिडीओ.