जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथे जुन्या वादातून एकासह त्यांच्या १० वर्षाच्या मुलीवर चॉपर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीतील मच्छी मार्केट येथे कैलास उखा पवार (वय-३२) हे आपल्या पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे तीन ते चार जणांनी कैलास पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपर हल्ला केला. यावेळी कैलास पवार यांची मुलगी तेजस्वीनी कैलास पवार (वय-१०) ही देखील घरात असतांना तिच्या हातावर देखील चॉपर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात कैलास पवार आणि तेजस्विनी पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, ज्यावेळी जखमी बाप लेकीला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिथे देखील हल्लेखोर हे आले पुन्हा हल्ला करण्यासाठी आले होते. परंतू रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी दिसून आल्याने तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले.