चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वेले येथील अनाथाश्रम (बालगृह) येथे सेवाभावी संस्थांतर्फे नुकतेच शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाप्रसंगी अमर संस्थेचे संस्थापक चंद्रकांत पाटील यांनी मनोगतात सांगितले की, अनाथांच्या दारी क्षणभर थांबून मनभर देता आले नाही तरी कणभर दिल्याने आत्मिक समाधानाबरोबर परमेश्वर प्राप्तीची अनुभूती होत असते. असा संदेश उपस्थितांना देत सेवाभावी युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य केलेल्या व सामाजिक सद्भावनेने प्रभावित झालेले अनिल बाविस्कर, लक्ष्मण पाटील, कुलभूषण दोडे, प्रकाश पाटील, किरण चौधरी, भूषण कोळी आदींनी सामाजिक दायित्वातून अनाथाश्रमातील ३५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले आहे. प्रत्येकी वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर व खाऊचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थिनींनी कर्णमधुर सुरेल असे स्वागत सादर करण्यात आले आहे. त्यांनतर प्रकल्प व्यवस्थापक शेषराव पाटील यांनी संस्थेच्या दैदीप्यमान वाटचालीबद्दल उपस्थितांना अवगत केले.