चोपडा प्रतिनिधी | अजमेर येथून १४ तलवारींचा साठा घेऊन येणार्या चौघांना चोपडा पोलिसांनी अटक केली असून एक जण मात्र फरार झाला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, राजस्थानमधून चारचाकीत तलवारींचा साठा आणला जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती. या अनुषंगाने वनविभागाच्या सत्रासेन चेकपोस्टजवळ पोलिसांनी कारवाई केली. या चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी तैनात होते. पोलिसांनी मध्यप्रदेश सीमेकडून अजमेरहून येणार्या ओमनी गाडीची (क्र.एम.एच.१९- सी.एफ. ४५७१) तपासणी केली. या गाडीत चार जण तलवारी घेऊन चाळीसगावकडे जात होते. त्यांना पोलिस नाईक राकेश पाटील यांनी पकडले. संशयित ओमनी चालक मुस्तफीन खान (वय २३), आरिफ इब्राहिम पिंजारी (वय २७), फहीमखान जमील खान (वय २८), सलमान अयुबखान (सर्व रा.चाळीसगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईदरम्यान संशयित मुश्रीफ खान (रा.भडगाव) हा जंगलात पसार झाला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. तर पाचव्या फरार आरोपीचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे.