चोपडा प्रतिनिधी | शहरातील १३ वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, चोपडा शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेणारा १३ वर्षाचा पीडित मुलगा २६ मार्च २०१८ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुटीत शाळेच्या बाजूला असणार्या व्यापारी संकुलामधील दुकानात केक घेण्यासाठी जात असतांना लासूर येथील सचिन गुलाबराव सैंदाणे (वय ३१) याने पीडित मुलाचा हात धरून त्याला बळजबरीने व्यापारी संकुलातील शौचालयात नेऊन पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला.दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादिवरुन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला अमळनेर जिल्हा न्यायालयात सुरू होता. यात न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला कलम ३७७नुसार ७ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष कारावास, बालकाचे लैंगिक अत्याचार गुन्हे संरक्षण कायद्यानुसार ७ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष कारावास, अशी शिक्षा सुनावली.