चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा सांस्कृतिक महोत्सव दरवर्षाप्रमाणे चोपडा वासियांना आगळा – वेगळा आनंद, उत्साह देणारा ठरला. बाळ – गोपाळांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळलेला होता. सदर कार्यक्रमात बालवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व 100% सहभाग होता. कार्यक्रमात नाविन्यता यावी म्हणून त्यात नृत्य, नाटिका, भारूड, शिक्षण, पाणी टंचाई, अंधश्रद्धा, आतंकवाद, श्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण यांसह विनोदी धमाल असे विविध पैलू कार्यक्रमात पाहायला मिळाले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
19 ते 24 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी दिव्य मराठीचे संपादक संपादक त्र्यंबक कापडे, चोपडा तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित, पुरवठा अधिकारी इखनकर साहेब, गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे, केंद्रप्रमुख ए.एस.साळुंखे, नरेंद्र सोनवणे, दीपक पाटील, नगरसेविका सुप्रिया सनेर, कांतीलाल सनेर, डॉ चारुशीला पाळवदे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, हेमलता बोरोले, दिपाली बोरोले, प्रतिभा बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, एम व्ही पाटील, व्ही आर पाटील, मिलिंद पाटील, डॉ किशोर पाठक, रेखा पाटील, नीता पाटील आदीची विशेष उपस्थिती होती.
सदर महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांसोबत स्पर्धा परीक्षेत, क्रीडा प्रकारात तसेच विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या तब्बल 300 विद्यार्थ्यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले. सदर महोत्सवात इडा पीडा टलू दे, मेरे प्यारे पापा मंगळागौरी, शंभूराजे पोवाडा, अहिराणी गीत, अंगात आलाय देव, मन मे शिवा – बाला तसेच शिक्षकांचा डान्स आकर्षण ठरला. त्याचबरोबर महिला सबलीकरण, आईचे अस्तित्व, व्यसन मुक्ती नाटिका, बाप एक नंबरी – बेटा दस नंबरी या विनोदी नाटिकेने उपस्थितांना हसवून लोटपोट केले. यासह अनेक गीतांना प्रेक्षकांची मनापासून दाद मिळाली. काही गीतांवर प्रेक्षकांनी मनापासून नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालवाडी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.