चोपडा प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या नियोजीत विविध विकासकामांचे भूमिपुजन उद्या मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपालिकेच्या माध्यमातून चोपडा शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. कामगार व उत्पादन शुल्क विभाग मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.
याप्रसंगी नगराध्यक्ष मनीषा चौधरी म्हणाल्या की, चोपडा शहराच्या विकासासाठी १७ कोटींची विकास कामे प्रस्तावित असून त्यांची निविदा लवकरच निघणार आहे. यामध्ये महात्मा गांधी उद्यान, सुशोभिकरण, विकसित करणे (२ कोटी) कस्तुरबा हायस्कूल ते हरेश्वर पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण व दुभाजक उभारणे (टप्पा १- २ कोटी) व हरेश्वर पूल ते शिरपूर बायपासपर्यंत रस्ता डांबरीकरण व दुभाजक उभारणे (टप्पा २-२.५०) कोटी अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
यासोबत चौदाव्या वित्त आयोग अनुदान अंतर्गत ९ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात मासळी मार्केट उभारणे व वाढीव गाळे व पहिला मजला बांधकाम व प्रवेशद्वार करणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत सव्वा दोन कोटींची रस्ता व गटारींची कामे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत साडेतीन कोटींची रस्ता व गटारींची कामे आदींचा समावेश असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी याप्रसंगी दिली.
या पत्रकार परिषदेला यावेळी गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, नगरसेवक अशोक बाविस्कर, कैलास सोनवणे, हुसेनखा पठाण, वसंत पवार, प्रा. कांतीलाल सनेर आदी उपस्थित होते.