चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज वरिष्ठ महाविद्यालयातील रासेयो व रेड रिबन क्लबतर्फे जागतिक एड्स दिवस व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. शैलेश वाघ तर अध्यक्ष म्हणून डॉ. किशोर पाठक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गिताने करून उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप गिऱ्हे यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका, महत्त्व व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती काळाची गरज आदींचे महत्त्व विशद केले.
मार्गदर्शन प्रसंगी डॉ. शैलेश वाघ यांनी एड्स संदर्भात बोलतांना माकडाकडून मानवात एचआयव्ही संक्रमित झाल्याचा इतिहास सांगून त्याची लागण होण्याची कारणे, असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही बाधित रक्त संक्रमण, एचआयव्ही बाधीत महिला मातेकडून नवजात अपत्याला, दुसऱ्याच्या रक्ताचा ब्लेड संपर्कात आला तर एचआयव्ही लागण होऊन मानवी शरिरातील रोग प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत जावून इतर आजार प्रबळ होतात व त्यामुळे एचआयव्ही बाधित रुग्ण दगावतात. यावरील उपाययोजना काय केल्या पाहिजेत, तर तरूण व प्रौढ मंडळीने जागृत होऊन समाजात जनजागृती करावी. स्वनियमन व स्वनियंत्रणाच्या माध्यमातून एड्स सारख्या मानवभक्षक विळखा सहजपणे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. किशोर पाठक यांनी एड्स जनजागृती संदर्भातील संस्थाची माहिती सांगून तरूणांनी जागृत राहावे व जागृत तरूणांनी आपल्या परिसरातील व्यक्तीना जागृत करावे त्यामुळे यासंदर्भात मोठया प्रमाणात जाणिवजागृती होईल यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप गिऱ्हे, तर आभार प्रा. सुनिल सुरवाडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.