चोपडा प्रतिनिधी । येथील वीज वितरण विभागाचा लहरी कारभार बंद करण्याची मागणी पत्रकार संघटनेतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, वीज वितरण कंपनीने चोपडा शहरात कोणतीही पूर्व सूचना न देताच ठेकेदारांच्या माध्यमाने मीटर बदलण्याचा धडाका लावला असून वीज ग्राहकांमधे यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न देता ग्राहकांशी उर्मट वागणूकीचे प्रकार देखील निदर्शनास आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री सावकारे यांचेकडे विविध आठ मुद्द्यांवर माहिती व दाद मागण्यात आली असून नायब तहसीलदार महेश साळुंखे यांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. या प्रकरणी वस्तुस्थिती समोर येऊन आवश्यकता असल्यास जनतेला विश्वासात घेऊन रीतसर कार्यपद्धती ने काम व्हावे अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे. एरव्ही निर्ढावलेल्या अवस्थेतील वीज वितरण कर्मचार्यांनी आकडे टाकून सर्रास होत असलेली चोरी रोखण्यासाठी तसेच सामान्य वीज ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी देखील अशीच कार्यतत्परता दाखवावी अशी मागणी यावेळी अधिकार्यांना करण्यात आली. या प्रसंगी अजय पालीवाल, मिलिंद सोनवणे, शाम जाधव, सचिन जैस्वाल, सुशिल टाटीया यांनी निवेदन देऊन समस्येवरील चर्चेत सहभाग घेतला.