चोपडा प्रतिनिधी | येथील पाच व्यापार्यांकडून भुसार माल खरेदी करून यासाठीचे सव्वा दोन कोटी रूपये देण्यास टाळाटाळ करणार्या पाच जणांविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत २ ऑगस्ट ते ८ डिसेंबर २०२० दरम्यान सतीश गोकुळ पाटील, सौरभ सतीश पाटील, सुनील अग्रवाल, मगलाल अग्रवाल, अजय अग्रवाल, अशोक अग्रवाल यांनी त्यांचा भुसार माल (गहू ,मका ,बाजरी ) दिनेश लुणावत, शुभम लुणावत, सुमित लुणावत (सर्व रा.मनमाड), अमित कोठारी व संगीता कोठारी (रा.श्रीरामपूर) यांनी खरेदी केला होता. हा सुमारे सव्वा दोन कोटी रूपयांचा माल खरेदी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ करून संबंधीत व्यापार्यांची फसवणूक केली आहे. यामुळे चोपडा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून यानुसार पाचही जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित दिनेश कांतीलाल लुणावत, शुभम राजेंद्र लुणावत, सुमित राजेंद्र लुणावत यांच्याविरुद्ध धरणगाव येथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पिंप्री (ता. धरणगाव) येथील जागेश्वरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे मालक प्रतिक राजेश भाटिया यांच्याकडून ३ कोटी ७५ लाखांवर कडधान्य खरेदी करून त्यांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता चोपडा येथील फसवणूक प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.