चोपडा प्रतिनिधी | गोवंशाची अवैध वाहतूक करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करून १९ गुरांची सुटका केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बोरअजंटी येथे ग्रामीण पोलिसांना शनिवारी सकाळी वैजापूर गावाकडून एक पिकअप वाहन संशयास्पद अवस्थेत दिसले. या वाहनाची थांबवून तपासणी केली असता त्यात ६ गुरे दाटीवाटीने भरलेले आढळले. यानंतर लागलीच मागून आणखी दोन पिकअप व्हॅनची ही तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये अवैधरीत्या वाहतूक करत दाटीवाटीने भरलेली १३ गुरे आढळली. या प्रकरणी या वाहनांवरील चालक राजेंद्र उर्फ राजू इंधन बाविस्कर (वय ४०, रा. सुंदरगढी, चोपडा), सुनील शालिक कोळी (वय ३०, रा. बोरअजंटी), अशोक सुदाम मिस्तरी (वय ५०, रा. नागलवाडी) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण १९ गुरे, ३ पिकअप वाहने असा एकूण ९ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातून १९ गुरांची सुटका करण्यात आलेली आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, विनोद पाटील, अनिल चाटे यांच्या पथकाने केली आहे.