चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील एक अनोखा उपक्रम आज विद्यालयात राबविला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठा अधिकारी किंवा पुढाऱ्याची मुलाखत न घेता चक्क शाळेचे शिपाई प्रकाश रमेश जाधव यांची मुलाखत घेत, त्याच्या संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेतला.
आतापर्यंत तुम्ही अनेक नामवंत व्यक्तींचे,प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलाखती बघितल्या वा ऐकल्या असतील. परंतू विवेकानंद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज चक्क विद्यालयातील मदतनीस अर्थातच शिपाई प्रकाश रमेश जाधव यांची मुलाखत घेऊन त्याच्या संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश झोत टाकला. त्यातून मुलांना नीतिमूल्य समजली. या जगात कोणतेही काम श्रेष्ठ व कनिष्ठ नसते. तसेच काम करणारे व्यक्तीही त्या कामामुळे श्रेष्ठ व कनिष्ठ नसतात. कोणताही माणूस त्याच्या शिक्षण व करत असलेल्या कामामुळे मोठा किंवा लहान नसतो. हे या मूलाखतीतून अनुभवले. या अनोख्या उपक्रमास विद्यालयातील उपशिक्षिका माधुरी हळपे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलाखतीस विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,उपशिक्षक संदीप कुलकर्णी,कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्यासह इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी भावे सरांच्या हस्ते प्रकाश जाधव यांचा रुमाल,टोपी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर सर्व विद्यार्थ्यांमार्फत प्रकाश जाधव यांना भेटवस्तू देण्यात आली. यामुळे या मुलाखतीतून विद्यार्थ्यांनी विद्यालयात शिपाई घटक हा किती महत्त्वाचा असतो हे जाणून घेतले. शिपाईचे काम देखील एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखेच महत्त्वाचे असते. हे यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावली मधून प्रकाश जाधव यांचे शिक्षण, शाळेतील विविध अनुभव, त्यांच्या या कामातील सहभाग ,त्यांचा शिपाई पदावर नियुक्तीचा प्रवास, असे अनेक प्रश्नांच्या उत्तरातून माणूस परिस्थितीनुसार कसा घडत जातो व बदलत जातो याचे अनुभव कथन केले. या मुलाखतीमुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना देखील हा उपक्रम प्रेरणादायी व आदर्श ठरत आहे. या अनोख्या उपक्रमसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रविंद्र जैन, सर्व विश्वस्त मंडळ , शिक्षकवृंद, पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.