सावदा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिनावल येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. भव्य शोभायात्रा, मूर्ती मिरवणूक आणि ग्रामदेवतांना आमंत्रण देण्याच्या परंपरेनुसार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम नवीन महादेव मंदिरावर विद्युत पूजाअर्चा करण्यात आली. सजवलेल्या बैलगाडीत शिवलिंग, नंदी आणि गणपती यांच्या मूर्ती ठेवून गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. “ओम नमः शिवाय”, “हरे राम हरे कृष्ण” च्या गजरात शेकडो स्त्री-पुरुष भाविक या सभाद्य शोभायात्रेत सहभागी झाले होते.
महिला मंडळांनी डोक्यावर कलश ठेवून टाळ-मृदंगाच्या तालावर जयघोष करत गावातील सर्व मंदिरांना प्राणप्रतिष्ठेचे विधिवत आमंत्रण दिले. या भव्य मिरवणुकीत शिव-पार्वतीचा संजीव देखावा आणि शिवाजी महाराजांचा देखावा विशेष आकर्षण ठरले.
यानंतर महादेव मंदिरावर मूर्ती धनधान्य व साखर राशीत ठेवून विधीवत स्थापना करण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी मूर्ती शयन विधी पार पडणार आहे. 21 फेब्रुवारीला शिवलिंग, नंदी आणि गणपती यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा पूर्ण केली जाईल. ग्राम प्रदक्षिणा आणि शोभायात्रेला भाविकांचा महासागर उसळला, ज्यामुळे संपूर्ण गावात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.