जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवाद या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना आणि नटराज पूजनाने झाली. अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती व्हावी यासाठी ‘भारतीय सण’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नाट्यछटांचे सादरीकरण करत अभिनय कौशल्य सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मोबाईलच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ‘बालरसिक मंच’ची स्थापना करण्यात आली तसेच विविध शाळांमधील ६४० विद्यार्थ्यांनी बालप्रेक्षक सभासद नोंदणी उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिषद पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.