Home Cities मुक्ताईनगर युनिक इंटरनॅशनल शाळेत बालगुरूंनी साकारला शिक्षकांचा रोल

युनिक इंटरनॅशनल शाळेत बालगुरूंनी साकारला शिक्षकांचा रोल

0
189

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  युनिक इंटरनॅशनल शाळेत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने नव्हे तर उत्साह, सृजनशीलता आणि आदरभावनेने भरलेला आगळा-वेगळा कार्यक्रम साजरा केला. बालगुरूंनी आपल्याच सहाध्यायांना शिकवण्याचा अनुभव घेत शाळेतील वातावरण खेळीमेळीचे आणि प्रेरणादायी झाले. एकमेकांमध्ये शिक्षकाची भूमिका निभावत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान व त्यांच्या भूमिकेचे महत्त्व नव्याने समजून घेतले.

या दिवशी शाळेतील विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षकांची भूमिका साकारली. त्यांनी आपापल्या सवंगड्यांना अभ्यासक्रमातील विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ही भूमिका निभावताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, जबाबदारी आणि आनंद झळकत होता. इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्रांमध्ये ‘गुरू’ पाहण्याचा एक आगळा अनुभव घेतला.

कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या बालगुरूंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. शाळेतील शिक्षिका कांचन पाटील, साक्षी पाटील, अर्चना बैरागी, शुभांगी निळे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. सौ. प्रतीक्षा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंग भरले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मासुळे सर यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मन:पूर्वक कौतुक करत शिक्षण प्रक्रियेतील परस्पर संवादाचे आणि सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन करत जीवनात शिक्षकांची भूमिका का आवश्यक आहे, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फक्त एका उत्सवापुरता मर्यादित न राहता, त्यांना नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षण प्रक्रियेतील गुंतवणूक समजावणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. युनिक इंटरनॅशनल शाळेतील शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवणारा ठरला.


Protected Content

Play sound