Home धर्म-समाज बुलढाण्यात आज चिमुकल्यांचा तान्हा पोळा ; पारंपरिक संस्कृतीचा अनोखा उत्सव

बुलढाण्यात आज चिमुकल्यांचा तान्हा पोळा ; पारंपरिक संस्कृतीचा अनोखा उत्सव


बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळा आज बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहात आणि पारंपरिक ढंगात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. गावागावांत लहानग्यांनी आपल्या लाकडी किंवा मातीच्या बैलांना सजवून ‘ठोंबरा द्या ठोंबरा’ म्हणत घरोघरी जाऊन आनंद साजरा केला. एकीकडे आधुनिकता वेगाने ग्रामीण संस्कृतीला गिळंकृत करत असली, तरी तान्हा पोळा ही परंपरा आजही जीवंत असल्याचे चित्र गावांतून पाहायला मिळत आहे.

बैलपोळा साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. ‘ठोंबरा द्या’ म्हणत चिमुकले घरोघरी फिरतात आणि जमलेले दोन पैसे संध्याकाळी एकत्र करून खाऊसाठी वापरले जातात. या उपक्रमामुळे बालकांमध्ये एकत्र येण्याची, सामाजिक संवाद साधण्याची आणि पारंपरिक सणाचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळते. शहरी भागात झपाट्याने हरवणारी ही परंपरा ग्रामीण भागात अजूनही सश्रद्धतेने पाळली जात असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तान्हा पोळा म्हणजे केवळ एक बालसण नसून, आपल्या संस्कृतीची मुळे टिकवून ठेवणारा एक सामाजिक उपक्रमही आहे. लहानग्यांच्या आनंदात मोठ्यांनीही सहभाग घेत पारंपरिक सणाचे सौंदर्य अधिक खुलवले.

कसा साजरा होतो तान्हा पोळा
मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आज तान्हा पोळा हा सण येतो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. गेल्या काही वर्षांपासुन या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जाते. त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काहीनाकाही छोटी भेटवस्तु दिली जाते.


Protected Content

Play sound