जळगाव (प्रतिनिधी) – बालकांनी बोललं पाहिजे त्यांना व्यक्त होता येणं काळाची गरज आहे. त्यांच्या भाषेत ते बोलतात ते आपण ऐकले पाहिजे. त्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या घटना, वस्तू, निसर्ग, हालचाली यांचे ज्ञान त्यांना कसे होते, त्याप्रमाणे ते प्रतिसाद देतात असे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित किलबिल बालक मंदिरात आयोजित अभ्यास जत्रा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बालनिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.रविंद्र माळी यांनी विचार मांडले.
यावेळी मंचावर केसीई शालेय विभाग, शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, किलबिल बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी, गुरुवर्य प.वि.पाटील प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, खडके प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा जोशी उपस्थित होते. गेली आठ वर्ष सलग अभ्यास जत्रा उपक्रम राबवला जात आहे. यातून विद्यार्थ्यांच्या आकलन आणि त्याच्या परिसर अभ्यासाचा आणि त्याला बोलते करून त्याच्या सर्वांगीण विकासासोबत त्याच्या पालकांना त्याच्या या आनंदी शिक्षणाचा आनंद मिळत आहे, असे केसीई शालेय विभाग, शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.
बाल वर्गातील बालक अभ्यास जत्रेत त्यांनी मांडलेल्या विविध वस्तू, शालेय साहित्य, गोष्ट, फळांचे चित्र आदींच्या माध्यमातून भरभरून बोलतात. आपले कुणी तरी ऐकत आहे, याची त्याना जाणीव होते आणि नित्य या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे, असे किलबिल बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी यांनी सांगितले. यावेळी किलबिल बालक मंदिरच्या शिक्षिका रत्नप्रभा कुरकुरे, मेधा कोळे, तृप्ती आटाळे, मनीषा आमोदकर, शालिनी पाटीलव कुंदा चौधरी उपस्थित होत्या. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षिका, मदतनीस व पालक यांनी सहकार्य केले.