चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोढरे येथील ८ वर्षीय बालकाचे २८ जून रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर ५ जुलै रोजी त्याचा मृतदेह एका गोणीत आढळून आला होता. मागील १० दिवसापासून खुनाचे धागेदोरे सापडत नसल्यामुळे आज अखेर पोलिसांनी खुनाची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस घोषित केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, बोढरे येथील ऋषिकेश पंडित सोनवणे (वय १०) हा शुक्रवारी २९ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजेपासून गावातून बेपत्ता झालेला होता. सर्वत्र शोध घेऊन देखील ऋषिकेश कुठेही आढळून न आल्यामुळे या संदर्भात हरवल्याची नोंद चाळीसगाव पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान, ५ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारस बोढरे गाव शिवारातीलाच पेट्रोलपंप समोरील एका विहीर लगत असलेल्या खड्ड्यात असलेल्या गोणपाटातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन बघितले असता. गोणपाटावर मोठे दगड ठेवलेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोते उघडून बघितले असता, कुजलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. थोड्याच वेळात त्या बालकाची ओळख ऋषिकेश सोनवणे अशी पटली होती.
या घटनेनंतर बोढरे गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. १० दिवस उलटल्यानंतरही बालकाच्या खुन्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल १ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या खुनाबद्दल काहीही माहीती असल्यास त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम व चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी केले आहे. दरम्यान, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. डीवायएसपी श्री.कडलक यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे.