किनगावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथे सोमवारी बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तेव्हा यावल येथील एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी हा विवाह रोखला. त्यानंतर सर्व वधूपक्षातील सर्वांनाच घेऊन थेट यावल शहरातील पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी त्यांना कायद्याची समज देण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणी विवाह होत नव्हता तर आम्ही केवळ साखरपुडा करत होतो असे वधु-वर पक्षांनी सांगितले. तेव्हा दोन्ही पक्षांना या ठिकाणी पोलिसांनी समज देऊन सोडले आहे.

किनगाव ता. यावल या गावात सोमवारी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केला जात असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. तेव्हा त्यांनी सदर माहिती खरी आहे का याची पडताळण्या करण्या करिता थेट पथकासह किनगाव गाठले व किनगाव गावातील इचखेडा जाणाऱ्या रस्त्यावर आदिवासी वस्तीवर बालविवाह सुरू असल्याचे मिळून आले. दरम्यान महिला व बालविकास अधिकारी अर्चना आटोळे या विवाह स्थळी पोलिसांना सोबत घेऊन दाखल होत. हा बालविवाह रोखला आणि वधू आणि वधू पक्षाच्या लोकांना घेऊन त्यांनी थेट यावल पोलिस ठाणे गाठले. यावल पोलीस ठाण्यात वधु-वर पक्षांची पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली. या चौकशीत त्यांनी सांगितले की या ठिकाणी आम्ही विवाह करत नव्हतो तर साखरपुडा केला असे सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलीचा विवाह आपण केला तर तो कायदेशीर गुन्हा आहे. मुलगी केवळ १४ वर्षाची असून जोपर्यंत ती १८ वर्षाची होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचा विवाह कायदेशीर रित्या करू शकत नाही आणि तसे केल्यास तुमच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल. अशी समज वधू-वर पक्षांना देण्यात आली व तशी नोंद देखील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाई करिता यावलच्या एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी अर्चना आटोळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, संदीप तायडे, हवलदार मोहसीन खान, अलाउद्दीन तडवी, संदीप साळवे यांनी परिश्रम घेतले व हा बालविवाह रोखण्यात आला.

Protected Content