बोदवड–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील चिखली–शेवगा–वळजी मार्गे माळेगाव निपाणा रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, हा रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भ्रष्टाचारविरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य (भारत सरकार मान्यताप्राप्त) संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

चिखली, शेवगा व वळजी गावांना जोडणारा हा रस्ता बुलढाणा व मलकापूरकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, थेट बोदवड–मलकापूर रस्ता सोडल्यानंतर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, शाळकरी मुलांना शिक्षणासाठी ये-जा, तसेच नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, आजपर्यंत खड्डे बुजवण्याचे कामही नीट झालेले नाही.

या गंभीर परिस्थितीबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे व राज्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार स्वरूपाचे निवेदन दिले. निवेदनात येत्या एका महिन्यात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खानदेश व विदर्भाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, बोदवड येथील शेतकरी संघटनेचे सुवर्णसिंग पाटील यांनीही हा मुद्दा वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा भ्रष्टाचारविरोधी आक्रोश संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी स्पष्ट केले आहे.



