जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे भासवून पाचोऱ्याच्या एका पती-पत्नीने तब्बल १८ तरुणांची ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी रात्री शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले हितेश रमेश संघवी (वय ४९) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (वय ४५) यांनी नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही फसवणूक केली. सध्या नवी मुंबई येथे राहणाऱ्या या दाम्पत्याने बेरोजगारीचा गैरफायदा घेत जळगावातील तरुणांना लक्ष्य केले. हितेश संघवीने स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात स्वीय सहायक भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रे, लेटर पॅड आणि नियुक्तीपत्रांचा वापर केला.

या बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्याने १८ तरुणांचा विश्वास संपादन केला. त्यांना रेल्वेत नोकरी मिळवून देणे, म्हाडाच्या योजनेत फ्लॅट मिळवून देणे, रेल्वेचे टेंडर मिळवून देणे आणि रेल्वे अधिकाऱ्यांसाठी गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवले. या वेगवेगळ्या कामांसाठी त्याने हर्षल शालिग्राम बारी यांच्याकडून १३ लाख ३८ हजार रुपये आणि इतर १७ जणांकडून ४२ लाख २२ हजार रुपये, असे एकूण ५५ लाख ६० हजार रुपये उकळले.
दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही काम किंवा नोकरी न मिळाल्याने आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हितेश आणि अर्पिता संघवी या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आता या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.



