मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा दिलासा आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल. सध्या ७५ हजार ५७८ अशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.